बनावट नोटा विक्री करणारे जेरबंद

नवी मुंबई : बनावट नोटा वितरित करणाऱ्या दोन इसमांना तुर्भे नाका परिसरातून जेरबंद करण्यात आले असून त्यांच्याकडून आतापर्यत २८,६०० रुपयांच्या बनावट नोटा तसेच छपाईचे साहित्य जप्त करण्यात आलेले आहे. दोन इसम भारतीय चलनातील बनावट नोटा वितरित करण्यासाठी तुर्भे एमआडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तुर्भे नाका परिसरात येणार असल्याची खबर सहा.पोलीस उपनिरीक्षक उल्हास कदम व त्यांच्या पथकाला मिळताच सदर ठिकाणी उपायुक्त परिमंडळ १ चे डॉ. सुधाकर पाठारे, सहा.पोलीस आक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि अमर देसाई यांच्या सहकाऱ्यांनी सहा.पोलीस निरीक्षक उल्हास कदम, पोलीस हवालदार दिगंबर झांजे, पोलीस नाईक सागर रसाळ, सोमनाथ बने, योगेश ठाकूर, स्वप्नील अहिरे, पोलीस शिपाई सुरेश जाधव, युवराज राऊत आदींच्या पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून विनोद बलीनाथ गोस्वामी (३८ रा.चांदिवली,) व महेश लालाराम चौधरी (२७ रा. मलवणी) यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून वरील वर्णनाच्या नोटांसह नोटा छापण्यासाठी वापरलेले प्रिंटींग मशिन, छपाईसाठीचा कोरा बॉण्डपेपर, चिकटपट्टी बंडल, फुटपट्टी इतर साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. या दोघांच्या अटकेमुळे मोठ्या प्रमाणात बनावट नोटा बनविण्याची टोळी उघडकीस येणार आहे.